(बालकथा) सत्याचा विजय

एका गावात एक शेतकरी आपल्या मुलीसोबत एका छोट्याशा झोपडीत राहत होता. त्याच्याकडे शेती करायला थोडी फार जमीन होती. धान्य, चारा विकून  थोडे फार पैसे मिळायचे, पण त्या पैशांत दोन वेळचे जेवणही करता येत नव्हते. एके दिवशी शेतकरी आपली समस्या घेऊन राजाकडे गेला.राजा खूप दयाळू होता. त्याने आपल्या जमिनीतील काही तुकडा शेतकऱ्याला कसायला दिला आणि सांगितले की ही जमीन आमचीच राहील पण त्यावर जे काही पिकेल ते तुझेच असेल. शेतकऱ्याला फार आनंद झाला आणि राजाचे आभार मानून तो आपल्या गावी परतला. एके दिवशी तो शेतात नांगरणी करत होता. तेवढयात त्याचा नांगर एका कठीण वस्तूमध्ये अडकला. नांगर पुढे जाईना. त्याने त्या ठिकाणी खुदाई केली असता, त्याला सोन्याची उखळ सापडली. शेतकरी खूप प्रामाणिक होता. त्याने आपल्या मुलीला सांगितले की आपल्याला ही सोन्याची उखळ राजाच्या शेतात सापडली आहे. ज्याची जमीन आहे, त्याचीच ही उखळ. म्हणूनच आपण ही उखळ राजाला परत केला पाहिजे.

त्याची मुलगी म्हणाली, 'नाही बाबा, असं काही करू नका.राजाने तुम्हाला त्याच्या जोडीचे सोनेरी मुसळ मागितले तर काय करणार? म्हणूनच तुम्ही ही उखळ तुमच्याकडेच ठेवा.'

पण शेतकऱ्याला मुलीचं हे बोलणं मुळीच आवडलं नाही. तो म्हणाला, 'जे आपल्याला मिळालेले नाही ते मागण्याचा अधिकार राजाला  नाही. तो उखळ घेऊन राजाकडे गेला. पण दरबारात असंच घडलं, जसं शेतकऱ्याच्या मुलीला वाटलं होतं. राजाला वाटले की, शेतकऱ्याने लोभापायी मुसळ आपल्याकडेच ठेवली आहे. पण बिचारा शेतकरी राजाला सोन्याची मुसळ कुठून  आणून देणार? परिणामी शेतकऱ्याला तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात त्याला ना नीट जेवण मिळत होतं ना पाणी. निष्पाप शेतकऱ्याला त्यानं न केलेल्या चुकीची शिक्षा  मिळाली होती. काही न खाल्ल्या-पिल्याने तो कृश बनला. तो झोपूनच असायचा. रात्रंदिवस रडायचा आणि म्हणायचा की खरंच! मी माझ्या मुलीचं ऐकायला पाहिजे होतं.

एके दिवशी राजाने त्याचे हे बडबडणे ऐकले, त्याने शेतकऱ्याला विचारले," हे तू काय बडबडतो आहेस?" शेतकऱ्याने राजाला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून राजाला आपली चूक कळून आली. त्याने ताबडतोब शेतकऱ्याची सुटका करण्याचे आदेश दिले.राजाने शेतकऱ्याच्या मुलीला आपल्या दरबारात बोलावले. तिच्याशी बोलताना राजाच्या लक्षात आले की ती खूप हुशार आहे. राजाने तिला राज्याच्या खजिन्याचा मंत्री केला, राहण्यासाठी घर आणि सर्व सुखसोयी दिल्या. तेव्हापासून शेतकरी आणि त्याची मुलगी आनंदाने राहू लागले. शेतकऱ्याला थोडा त्रास सहन करावा लागला.  पण शेवटी सत्याचाच विजय झाला. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Comments

Popular posts from this blog

वाईटाचा शेवट वाईटच होतो